(चिपळूण)
शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेले बारावे डेरवण युथ गेम्स दि. २७ फेब्रुवारीपासून श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्या क्रीडासंकुलात रंगणार आहेत. ता. २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२६ या कालावधीत या भव्य स्पर्धा पार पडणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे सेक्रेटरी व ज्येष्ठ क्रीडा संघटक चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
या क्रीडा महोत्सवात अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम यांसारख्या वैयक्तिक खेळांसह कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, योगा या देशी खेळांचा समावेश आहे. तसेच फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे सांघिक खेळही रंगणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाबरोबरच यंदा नव्याने स्केटिंगचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय पारंपरिक खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील सात हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण १२०० पदके आणि ११५ करंडक स्पर्धकांना बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत. अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनीही सहभाग निश्चित केला आहे.
८ वर्षांखालील ते १८ वर्षांखालील वयोगटातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली. या निमित्ताने राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा चित्तथरारक खेळ पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

