(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
पालि ॲन्ड बुद्धिस्ट रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे आणि सत्याग्रह महाविद्यालय, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन महा धम्मपद पालि भाषा महापरीक्षेत लांजा तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा रत्नागिरीचे महासचिव एन. बी. कदम यांनी ९४ टक्के गुणांसह घवघवीत यश संपादन केले आहे. ही परीक्षा दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडली होती.
पालि भाषेतील धम्मपदाच्या सखोल अध्ययनात दाखवलेली निष्ठा, सातत्य आणि अभ्यासपूर्ण समर्पण यांचे हे यशस्वी फलित असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेच्या वतीने त्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी आणि पालि भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या यशामुळे नवी दृष्टी मिळाली आहे.
एन. बी. कदम यांच्या या यशामुळे विविध सामाजिक, शैक्षणिक व बौद्ध संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व वैचारिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

