(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण येथील साहित्यिक-पत्रकार आणि कोकणातील पर्यावरण व पर्यटन क्षेत्राचे अभ्यासू कार्यकर्ते धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर यांच्या ‘जनी जनार्दन’ या चरित्रग्रंथाला पुण्याच्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा प्रतिष्ठेचा ग्रंथपुरस्कार जाहीर झाला आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाच्या माध्यमातून वाटेकर यांनी चरित्रलेखन क्षेत्रात केलेल्या योगदानाचा गौरव झाला आहे.
भारताच्या प्रबोधनपरंपरेतील न्या. महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा. गो. भांडारकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या १३२व्या वर्धापनदिनानिमित्त २४ नोव्हेंबर रोजी पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी फाऊंडेशनच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी नुकतीच यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली.
या सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष आणि डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा. डॉ. अलीम वकील, राजीव साने, डॉ. भारत सातपुते आदींनाही ग्रंथपुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसेवक प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांना डॉ. आनंद केळकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मराठी साहित्यविश्वात संशोधनपर आणि वैचारिक ग्रंथांना प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या पुरस्कारांना विशेष प्रतिष्ठा आहे. ‘जनी जनार्दन’ हा ७०८ पृष्ठांचा प्रेरणादायी चरित्रग्रंथ आहे. भारत सरकारच्या ‘हाफकिन’ संस्थेने शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय ऊर्फ तात्यासाहेब नातू यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांनी जीवन समर्पित केलेल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्षेत्राचा या ग्रंथात सविस्तर वेध घेण्यात आला आहे. मराठी साहित्यात अशा प्रकारचे महाचरित्र अपवादानेच पाहायला मिळते.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था अर्थात डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील सर्वांत जुनी साहित्य संस्था आहे. गेल्या १३० वर्षांपासून मराठीतील उत्कृष्ट ग्रंथांना पारितोषिके देऊन लेखकांना प्रोत्साहन देण्याचे काम संस्था करीत आहे. आधुनिक महाराष्ट्राचे आद्य प्रवर्तक न्या. महादेव गोविंद रानडे, जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर, प्रसिद्ध कादंबरीकार हरि नारायण आपटे आणि भारतीय अशांततेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासह पंचवीस द्रष्ट्या महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाच्या उद्देशाने १८९४ मध्ये या संस्थेची स्थापना केली. राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.
धीरज वाटेकर हे चिपळूणमधील १६२ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे संचालक आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी निमंत्रित वक्ते म्हणून सहभाग घेतला होता.
वाटेकर यांनी आतापर्यंत पर्यटनविषयक पाच आणि चरित्रात्मक चार अशा एकूण नऊ पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘चिपळूण तालुका पर्यटन’, ‘श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन’ (मराठी व इंग्रजी), ‘श्रीक्षेत्र अवधूतवन’ आणि ‘ठोसेघर पर्यटन’ ही त्यांची पर्यटनविषयक पुस्तके आहेत. तर ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’, ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’, ‘कृतार्थीनी’ आणि ‘जनी जनार्दन’ ही त्यांची चरित्रात्मक पुस्तके आहेत.
लेखनाबरोबरच संपादन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. ‘व्रतस्थ’ (कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर), ‘आयुष्य जगलेला गुरुजी’ यांसह विविध विशेषांक, स्मरणिका आणि गौरवांक अशा ३५हून अधिक संग्राह्य अंक व पुस्तिकांचे संपादन त्यांच्या नावावर आहे. यामध्ये कोकणातून गेली दीडशे वर्षे सातत्याने प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक सत्यशोधकचा सुमारे ४६० पानांचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी विशेषांक तसेच कोयना जलविद्युत प्रकल्पासह अलोरे (चिपळूण) गाव वसाहतीच्या गत पन्नास वर्षांच्या दुर्मीळ इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या शाळेच्या ४५० पानी संग्राह्य स्मरणिकेचा समावेश आहे.
‘जनी जनार्दन’ या चरित्रग्रंथाला मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे धीरज वाटेकर यांच्या साहित्यिक आणि संशोधनपर कार्याचा गौरव झाला असून, चिपळूणसह कोकणच्या साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


