(रत्नागिरी)
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) रत्नागिरी शाखेतर्फे सीए विद्यार्थ्यांसाठी विशेष संवाद व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. विवा एक्झिक्युटिव्ह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आयसीएआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
कार्यक्रमाची सुरुवात रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए केदार करंबेळकर यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाली. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
डब्ल्यूआयआरसी सदस्य सीए संजय निकम यांनी ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ या पदवीचे महत्त्व, समाजातील प्रतिष्ठा आणि त्यासोबत येणारी जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर डब्ल्यूआयआरसी सदस्य सीए मंगेश घाणेकर यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन, परीक्षेची तयारी आणि भविष्यातील व्यावसायिक संधींबाबत उपयुक्त टिप्स दिल्या.
मुख्य मार्गदर्शक सीए मंगेश किनरे यांनी बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ‘फ्युचर रेडी’ होण्याची गरज अधोरेखित केली. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आर्थिक क्षेत्रातील नव्या सुधारणांचा स्वीकार करून स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला देताना म्हटले की, “नियम, परीक्षा किंवा अन्य कोणत्याही शंकांबाबत सोशल मीडियावरील पोस्ट्सवर विश्वास ठेवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी थेट आयसीएआयशी संपर्क साधून अधिकृत माहिती घ्यावी.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षाली केळकर यांनी केले. शाखेचे उपाध्यक्ष सीए अक्षय जोशी यांनी आभार मानले. सचिव नचिकेत जोशी, खजिनदार शरदचंद्र वझे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील १०० हून अधिक सीए विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

