(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केल्याने गंभीर प्रकृती बनलेल्या करबुडे येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय कृष्णा मोहिते असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रत्नागिरीत प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ५ नोव्हेंबर रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय मोहिते यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी राहत्या घरासमोर दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याच दिवशी पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना ५ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती डॉ. कुणाल भांडूरे यांनी दिलेल्या वैद्यकीय-कायदेशीर (एमएलसी) नोंदीच्या आधारे पोलिसांना प्राप्त झाली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातून १६ नोव्हेंबर रोजी आवक क्रमांक २४०५/२०२६ अन्वये कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.


