(ठाणे / वृत्तसंस्था)
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते सायबर गुन्हेगाराने हॅक करून त्यावर अश्लील चित्रफिती अपलोड केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. पोलीस आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचेच व्हॉट्सॲप खाते लक्ष्य करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर सुमारे २० अश्लील चित्रफिती पोस्ट केल्या. मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा प्रकार सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.
व्हॉट्सॲप स्टेटसवर आक्षेपार्ह चित्रफिती अपलोड होत असल्याचे निदर्शनास येताच गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर कक्षाने तपासाची सूत्रे हाती घेतली. सायंकाळी सहाच्या सुमारास संबंधित सर्व चित्रफिती हटविण्यात आल्या. पोलीस उपायुक्त पराग मणेरा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, व्हॉट्सॲप खात्याचा अनधिकृत ताबा घेणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे सांगितले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर दिसलेल्या चित्रफितींवर विश्वास ठेवू नये, त्या डाउनलोड अथवा इतरांना फॉरवर्ड करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी केले आहे. नागरिकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, व्हॉट्सॲप खाते हॅक होण्याचा धोका टाळण्यासाठी सायबर पोलीस आणि तज्ज्ञांकडून टू स्टेप व्हेरिफिकेशन सुविधा सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. व्हॉट्सॲपच्या सेटिंगमधील अकाउंट विभागात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते. ही सुविधा सक्रिय केल्यानंतर पासवर्ड टाकल्याशिवाय व्हॉट्सॲप सुरू करता येत नाही. डेस्कटॉप व्हॉट्सॲपसाठीही ही सुविधा उपलब्ध असून, त्यासाठी कोड टाकण्याची व्यवस्था आहे. अशा वेळी लॉग आउट न करता डेस्कटॉप व्हॉट्सॲप बंद ठेवता येते.


