(दापोली /रत्नागिरी)
बटर आणि चीज आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्वांक राजेंद्र यादव असे मृत तरुणाचे नाव असून, दापोलीतील गिम्हवणे परिसरात झालेल्या अपघातानंतर त्याच्यावर डेरवण आणि मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्वांक यादव हा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास वडिलांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन बटर आणि चीज आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याच्या आईच्या मोबाईलवर पोलीस ठाण्यातून फोन आला. दापोली-गिम्हवणे मार्गावर दापोलीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर दुचाकीवरून पडून त्याचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी अवस्थेतील दुर्वांकला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात दुर्वांकच्या तोंडाला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारांनंतर त्याला पुढील उपचारांसाठी २६ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताचा भाऊ रंजित राजेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर काही दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


