(रत्नागिरी /प्रतिनिधी)
छातीत आणि पोटात वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या ८४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विष्णु सिताराम वेदांते (रा. पाली, देवतळे, वळके रोड, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पाली ग्रामीण रुग्णालयात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास विष्णु वेदांते हे लघुशंकेसाठी उठले होते. लघुशंका करून परतल्यानंतर त्यांच्या छातीत व पोटात दुखू लागले. तसेच छातीत कफ झाल्यासारखा आवाज येत असल्याने त्यांचे पुत्र उत्तम विष्णु वेदांते यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पहाटे ५.३० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये नोंद झालेल्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


