(नवी दिल्ली)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला कोणत्याही दबावाशिवाय तेलसाठे निर्यात करत राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. “सुरक्षा, अर्थव्यवस्था, व्यापार आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवादाला मानवतेवरील हल्ला ठरवत, “भारत आणि रशिया दहशतवादाविरुद्ध संयुक्तपणे लढतील,” असा संदेश दिला. त्यांनी भारत-रशिया मैत्रीला ध्रुवताऱ्यासारखी स्थिर आणि अविचल असल्याचे वर्णन केले.
शुक्रवारी हैदराबाद हाऊस येथे दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत कामगार स्थलांतर, आरोग्य सेवा, जहाजबांधणी, रसायने, खत निर्मिती यांसह एकूण ७ द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी मोदी यांनी रशियन नागरिकांसाठी मोफत ई-टुरिस्ट व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली.
करारांची देवाणघेवाण; दोन्ही देशांमध्ये वाढती भागीदारी
पुतीन आणि मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत कामगार स्थलांतर, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सुविधा, अन्नसुरक्षा, जहाज बांधणी आणि खत क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचे करार झाले. भारत-रशिया संबंधांना नवी दिशा देण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे. पत्रकार परिषदेत पुतीन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे कौतुक करत भारतीयांना रशियाबद्दलची माहिती आणि आपुलकी उल्लेखनीय असल्याचे सांगितले. मोदी यांनी दोन्ही देशातील व्यापार आणि धोरणात्मक सहकार अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतलेल्या समतोल व शांतताप्रिय भूमिकेची पुनरुच्चार केला.
कनेक्टिव्हिटीला गती; तीन मोठ्या वाहतूक प्रकल्पांवर लक्ष
भारत-रशिया कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर विशेष भर देत आहेत.
महत्त्वपूर्ण प्रकल्प :
● आयएनएसटीसी (International North-South Transport Corridor)
● नॉर्दर्न सी रूट
● चेन्नई–व्लादिवोस्तोक कॉरिडॉर
या मार्गांना नवीन ऊर्जा देण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. तसेच भारतीय नाविकांना पोलार वॉटरमध्ये प्रशिक्षण देण्याचेही ठरले आहे. युरिया उत्पादनासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात येणार असून हे भारताच्या अन्नसुरक्षा आणि शेतकरी कल्याणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात मोठी भागीदारी; ‘ब्रेन ट्यूमर’वर संयुक्त औषधनिर्मिती
पुतीन-मोदी भेटीत गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावरील महत्त्वाचे करार झाले. यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले पाऊल म्हणजे दोन्ही देश मिळून ब्रेन ट्यूमरवरील औषध विकसित करणार आहेत. व्यापारातही गेल्या वर्षात १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती पुतीन यांनी दिली.

