(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गुन्ह्याचा तपास केवळ पूर्ण करणे नव्हे, तर तो न्यायालयीन कसोटीवरही सक्षम ठरणे आवश्यक असते. तपासातील एखादी छोटीशी त्रुटी, पुराव्यांमधील कमतरता किंवा प्रक्रियेतील उणीव अनेकदा न्यायालयीन निकालावर परिणाम करू शकते. याच बाबीला केंद्रस्थानी ठेवत मागील तपासातून शिकून भविष्यातील तपास अधिक सक्षम करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने ‘अधिनिर्णय’ हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल व्यासपीठ विकसित केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम तपास अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रभावी दिशादर्शक ठरत आहे.
‘अधिनिर्णय’ ॲपच्या माध्यमातून दोषसिद्धी झालेल्या तसेच निर्दोष मुक्तता झालेल्या प्रकरणांचा सखोल अभ्यास केला जातो. या प्रकरणांमध्ये तपासात कोणत्या त्रुटी राहिल्या, कोणते पुरावे अपुरे ठरले, तपास प्रक्रियेत कोणत्या उणिवा राहिल्या आणि न्यायालयीन निकालावर कोणत्या बाबींचा परिणाम झाला, याचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे समान स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासात पूर्वी झालेल्या चुका ओळखून त्यांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होत आहे.
‘अधिनिर्णय’मधील ‘वन-पेज केस समरी’ हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी, तपासाची दिशा, करण्यात आलेली कार्यवाही, उपलब्ध पुरावे, न्यायालयीन निकाल आणि तपासातील महत्त्वाच्या त्रुटी यांचा संक्षिप्त आढावा एकाच ठिकाणी उपलब्ध होतो. त्यामुळे अधिकारी आणि अंमलदारांना संबंधित प्रकरणाची माहिती कमी वेळेत समजून घेता येते आणि भविष्यातील तपासाचे नियोजन अधिक अचूकपणे करता येते. या ॲपचा वापर केवळ डिजिटल नोंदवहीपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीशी जोडण्यात आला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दैनंदिन हजेरीच्या वेळी ‘अधिनिर्णय’मध्ये विश्लेषण केलेल्या प्रकरणांचे नियमित वाचन करतात. त्यामधून समोर आलेल्या तपासातील त्रुटी, न्यायालयीन निरीक्षणे आणि आवश्यक तपास पद्धती याबाबत अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे मागील प्रकरणांतून मिळालेला अनुभव थेट तपास पथकापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे.
‘अधिनिर्णय’ ॲपच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत न्यायालयीन निकाल लागलेल्या प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या विश्लेषणातून तपासातील त्रुटी आणि न्यायालयीन निरीक्षणांचे स्वरूप समोर आणण्यात आले असून, आगामी काळात न्यायालयीन निकाल लागलेल्या प्रकरणांची नोंद व त्यांचे विश्लेषण नियमितपणे करण्याची कार्यपद्धतीही सुरू ठेवण्यात येणार आहे. ‘मागील तपासातून शिकवण आणि AI आधारित विश्लेषणातून भविष्यातील तपासात सुधारणा’ या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे तपासाची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे. पुरावे संकलन, तपासाची कार्यवाही आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यामध्ये अधिक काटेकोरपणा आणता येणार आहे. परिणामी तपासातील त्रुटी कमी होऊन न्यायालयीन प्रक्रियेत दोषसिद्धीसाठी आवश्यक पुरावे अधिक सक्षमपणे सादर करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
गुन्हेगारी तपासात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना रत्नागिरी पोलिस दलाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ गुन्हे शोधण्यासाठी नव्हे, तर तपासातील चुका शोधून त्यातून पुढील तपास अधिक सक्षम करण्यासाठी केल्याने या उपक्रमाचे वेगळेपण अधोरेखित होत आहे. ‘अधिनिर्णय’मुळे तपासातील त्रुटींवर प्रकाश टाकत भविष्यातील तपासाची दिशा अधिक स्पष्ट करण्याचे काम होत असून, हे डिजिटल व्यासपीठ रत्नागिरी पोलिस दलासाठी प्रभावी दिशादर्शक ठरत आहे.

