(रत्नागिरी)
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सन्मानाने आणि सक्षमपणे जगता यावे, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. “माझ्या जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग बांधवांना किंवा भगिनींना काहीही कमी पडू देणार नाही,” अशी ठाम ग्वाहीही त्यांनी दिली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार वापरकर्त्यांना लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण तसेच दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष विलास चाळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, तसेच सदस्य बाबू म्हाप आणि बंड्या साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ औपचारिक नसून भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. प्रत्येक नगरपालिकेमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव असतो. या निधीतून ४० ते ६० टक्के दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना १२ हजार, ६० ते ८० टक्के असणाऱ्यांना १४ हजार आणि ८० ते १०० टक्के दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना १६ हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या माध्यमातून आवश्यक साधनसामग्री स्वतः खरेदी करण्याची संधी दिव्यांगांना मिळणार आहे.
तसेच, पुढील शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतः उपस्थित राहून दिव्यांगांच्या समस्यांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. “दिव्यांगांवर कुठलाही अन्याय होत असेल, तर तत्काळ कारवाई केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, जिल्ह्यातील विधवा, परित्यक्ता व एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती देत, अशा महिलांना जिल्हा नियोजन योजनेतून विविध लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांगांना सहाय्यक साहित्य तसेच मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.

