(गणपतीपुळे / वैभव पवार)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला गणपतीपुळे समुद्रकिनारा तब्बल ६० दिवसांनंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवार २४ ऑगस्ट रोजी दुपारपासून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली असून, गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची पुन्हा वर्दळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. तसेच लाटांची तीव्रता आणि समुद्रातील प्रवाह वाढण्याची शक्यता असते . त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून २६ जूनपासून गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. परंतु सध्या समुद्राची धोकादायक स्थिती कमी होऊ लागल्याने आणि पावसाचा जोर देखील कमी होऊ असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर समुद्रकिनारा पुन्हा खुला करण्यात आला आहे.
दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी गणपतीपुळे ग्रामपंचायती मध्ये एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेची माहिती पर्यटन व्यवसायिक व स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी थेट ग्रामसभेत जाऊन बीच खुला करण्याची मागणी लावून धरली. यावेळी ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांच्या मागणीवर चर्चा झाल्यानंतर गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
हा समुद्रकिनारा खुला झाल्याने गणपतीपुळे येथील पर्यटन व्यवसायाला पुन्हा मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे . येथील प्रसिद्ध गणपती मंदिरासह निसर्गरम्य समुद्रकिनारा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असल्याने आगामी काळात येथे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असला तरी पावसाळी वातावरण लक्षात घेता पर्यटकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. समुद्राचे खोल पाणी असलेल्या भागात पोहण्यासाठी उतरू नये. समुद्रात उतरताना जीवरक्षक व पोलीस यंत्रणा व स्थानिक व्यावसायिकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. समुद्र खवळलेला असल्यास किंवा लाटांची तीव्रता वाढल्यास पाण्यात जाणे टाळावे.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक समुद्रकिनाऱ्यावर असताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे. धोकादायक क्षेत्र म्हणून निश्चित केलेल्या भागात पर्यटकांनी जाऊ नये. समुद्रात पोहताना मद्यपान न करता निष्काळजीपणा करू नये. समुद्रातील अचानक बदलणाऱ्या परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता प्रशासन, जीवरक्षक आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
पर्यटकांनी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊनच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एकूणच , गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा खुला झाल्याने स्थानिक हॉटेल्स व लॉजिंग पर्यटन व्यावसायिक, दुकानदार आणि पर्यटनाशी संबंधित सर्वच लहान मोठ्या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

