(मंडणगड /रत्नागिरी)
ट्रकमधून प्रवास करताना क्लिनर साईडचा दरवाजा उघडल्याने खाली पडलेल्या ३६ वर्षीय क्लिनरचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंडणगड तालुक्यातील पन्हळीखुर्द येथे घडली. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पन्हळे स्टॉपजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकचालक मोहन रामा जाधव याच्याविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन रामा जाधव (वय ४१, रा. साळीवाडी, म्हाप्रळ, ता. मंडणगड) हा MH 08 W 8068 क्रमांकाचा ट्रक घेऊन म्हाप्रळ ते मंडणगड मार्गावरून जात होता. यावेळी ट्रकमध्ये क्लिनर साईडला बसलेला प्रशांत सुंदर चिरगुटकर (वय ३६, रा. शेनाळे, ता. मंडणगड) याच्या बाजूचा दरवाजा बंद असल्याची खात्री चालकाने केली नव्हती. तसेच ट्रक निष्काळजीपणे चालविल्याने पन्हळीखुर्द हद्दीतील पन्हळे स्टॉपजवळ अचानक दरवाजा उघडला आणि प्रशांत थेट रस्त्यावर खाली पडला. या अपघातात प्रशांत याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे शेनाळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी प्रदीप अरविंद जाधव (वय ४०, रा. पन्हळीखुर्द, म्हाप्रळ, ता. मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक मोहन रामा जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.


