(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘NCMC’ (National Common Mobility Card) अनिवार्य केल्याने प्रवाशांना होत असलेल्या त्रासाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आज एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभाग नियंत्रकांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी तसेच स्थानिक प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी एसटी बसच्या नियोजनाबाबतही प्रशासनासोबत यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
एसटी महामंडळाने १ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्डशिवाय सवलतीचे तिकीट नाकारण्याचा निर्णय लागू केला आहे. मात्र, प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील हजारो पात्र लाभार्थी अद्याप या कार्डापासून वंचित आहेत. केवळ ८२ दिवसांच्या कालावधीत सर्व प्रवाशांना कार्ड उपलब्ध करून देणे शक्य झालेले नाही. त्यातच वीजपुरवठा खंडित होणे, सर्व्हर डाऊन होणे, इंटरनेटची समस्या तसेच बायोमेट्रिक मशीनमधील बिघाड यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना वारंवार फेऱ्या मारूनही कार्ड मिळालेले नाही. परिणामी, ग्रामीण भागात कार्ड स्वाइप होत नसल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीट काढावे लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना शिवसेनेने विविध मागण्या मांडल्या. जोपर्यंत सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष NCMC कार्ड मिळत नाही, तोपर्यंत त्यांना पूर्वीप्रमाणे ओळखपत्राच्या आधारे सवलतीचे तिकीट देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ज्या प्रवाशांनी कार्डसाठी नोंदणी केली आहे, मात्र अद्याप कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांना नोंदणी पावती किंवा टोकन क्रमांकाच्या आधारे तात्पुरती सवलत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
‘कार्ड नाही म्हणून सवलत नाही’ या नियमाची सक्ती तात्काळ स्थगित करून ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणींचा भार प्रवाशांवर टाकू नये आणि त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच रत्नागिरी विभागातील सर्व आगार आणि प्रमुख बसस्थानकांवर पुरेशी NCMC केंद्रे आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा आग्रहही धरण्यात आला.
गणेशोत्सवात नियमित बसफेऱ्यांवर परिणाम होऊ नये
आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या बस नियोजनाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. कोकणातील सर्वात मोठ्या सणासाठी मुंबई आणि पुणे येथून लाखो चाकरमानी गावी येतात. या काळात अतिरिक्त बसगाड्यांचे नियोजन करताना जिल्ह्यातील नियमित स्थानिक बसफेऱ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली.
चाकरमान्यांसाठी अतिरिक्त वाहतूक व्यवस्था करताना स्थानिक प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नियमित वाहतूक विस्कळीत होणार नाही, तसेच नेहमीच्या प्रवाशांना त्यांच्या नियमित बसफेऱ्या वेळेवर उपलब्ध होतील, याची दक्षता घेऊन नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील आणि उपतालुकाप्रमुख विजय देसाई उपस्थित होते.
तसेच रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, पावस विभागप्रमुख किरण तोडणकर, महिला तालुकाप्रमुख ममता जोशी, महिला शहरप्रमुख सेजल बोराटे, लांजा महिला संघटिका आसावरी मांडवकर, नगरसेविका फौजिया मुजावर, शिरगाव महिला विभागप्रमुख आस्था धांगडे, कोतवडे महिला विभागप्रमुख साक्षी साळुंखे, लांजा युवा उपसंघटिका दिव्या मांडवकर, लेखिका व महिला शिवसैनिक मेघा कोल्हटकर, राजापूर शहर युवती अधिकारी गार्गी शिर्के आणि स्नेहा उगले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.

