(मुंबई / प्रतिनिधी)
प्राचीन बौद्ध लेणी, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबईस्थित आणि मूळ रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावचे सुपुत्र राकेश सदानंद पवार यांना ‘महाराष्ट्र राज्य लेणी संवर्धक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कला, पर्यटन व सांस्कृतिक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळ्यात अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते राकेश पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राकेश पवार हे लेणी अभ्यासक, इतिहास अभ्यासक, लेखक तसेच धम्म (ब्राह्मी) लिपीचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील विविध बौद्ध लेण्यांचा अभ्यास करणे, त्यावर लेखन करणे आणि ऐतिहासिक वारशाविषयी जनजागृती करणे, अशा विविध माध्यमांतून ते योगदान देत आहेत. ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह महाराष्ट्र – लेणी संवाद’ या समूहाच्या माध्यमातून ते लेणी अभ्यास दौरे आणि जनजागृतीचे उपक्रमही राबवितात.
‘लेणी – शिला संवाद’ या संकल्पनेतून बौद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राकेश पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या गौरवामुळे सैतवडे गावासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


