(देवरुख / वार्ताहर )
देवरुखनजीक असलेल्या कुंडी गावातील श्री केदारलिंग देवस्थानच्या देवराईत मध्य आशियातून हिवाळी स्थलांतर करून आलेल्या दुर्मीळ पॅलिड स्कॉप्स घुबडाचे दर्शन झाले आहे. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे विराज आठले यांनी या पक्ष्याची नोंद केली. कोकणातील नैसर्गिक वनक्षेत्रात या परदेशी घुबडाची उपस्थिती आढळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षीवैविध्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
‘पांढुरके शिंगळा घुबड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्याचे वैशिष्ट्य त्याचा फिकट करडा रंग आणि शरीरावर दिसणाऱ्या काळसर रेषा हे आहे. साधारण २१ ते २२ सेंटीमीटर लांबी असलेले हे घुबड आकाराने लहान असते. डोक्याच्या वरच्या बाजूला कानांसारखे दिसणारे पिसांचे दोन उंचवटे त्याला वैशिष्ट्यपूर्ण रूप देतात. स्कॉप्स समूहातील इतर घुबडांच्या तुलनेत शरीराचा फिकट रंग आणि पंखांवरील ठळक रेषांमुळे त्याची ओळख वेगळी ठरते. निशाचर स्वभावाचा हा पक्षी रात्री अधिक सक्रिय असतो, तर दिवसा झाडांच्या दाट पानांमध्ये किंवा खोडाच्या आडोशाला लपून राहतो. कीटक हे त्याचे प्रमुख खाद्य आहे.
या पक्ष्याचा प्रजनन अधिवास मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील प्रदेशांमध्ये आहे. तुर्कस्तान, इराण, इराक आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये त्याचा वावर आढळतो. हिवाळ्यात अनुकूल हवामान आणि खाद्याच्या उपलब्धतेच्या शोधात तो दक्षिणेकडील भागांकडे स्थलांतर करतो. या स्थलांतरादरम्यान अरबी द्वीपकल्प, इजिप्त, पाकिस्तान तसेच भारताच्या उत्तर-पश्चिम भागापासून महाराष्ट्रापर्यंत त्याची नोंद होते. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील कुंडी गावात आढळलेला हा पक्षी स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे.
कुंडी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर महिनतगड आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी श्री केदारलिंग देवस्थानची देवराई आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचे स्थान असलेल्या या देवराईने निसर्गाचा अनमोल ठेवाही जतन केला आहे. ग्रामस्थांनी श्रद्धेने सांभाळलेल्या या वनक्षेत्रात जुन्या वृक्षांची घनता, दाट वनस्पती आणि तुलनेने कमी मानवी हस्तक्षेप असल्यामुळे पक्षी व वन्यजीवांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्ष्यांनाही येथे सुरक्षित निवारा आणि खाद्य उपलब्ध होते.
सह्याद्रीच्या परिसरातील देवराया जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. विस्तीर्ण जंगलांपासून काहीशा वेगळ्या असलेल्या या लहान नैसर्गिक वनक्षेत्रांमुळे पक्ष्यांना विश्रांती घेण्यासाठी जागा, सुरक्षित निवारा आणि खाद्य मिळते. कुंडी येथील देवराईत दुर्मीळ पॅलिड स्कॉप्स घुबडाची झालेली नोंद ही केवळ एका स्थलांतरित पक्ष्याच्या दर्शनापुरती मर्यादित नसून, ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धेतून जतन केलेल्या देवरायांचे पर्यावरणीय महत्त्वही अधोरेखित करणारी आहे.


