(चिपळूण)
शहरातील भोगाळे परिसरातील महावीर पॅलेस इमारतीमध्ये परवानगीशिवाय अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चिपळूण नगर परिषदेकडून दिलेल्या अधिकृत तक्रारीच्या आधारावर करण्यात आली आहे.
नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक विजय गमरे (वय ३०, रा. खेड बावशेवाडी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, डॉ. संभाजी परशराम गरुड (रा. महावीर पॅलेस, भोगाळे) यांनी सदर इमारतीमध्ये पत्राशेड, जिना, पाण्याची टाकी, युटिलिटी व कपाटे यांसारखी संरचना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारली. हे बांधकाम १५ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु असून अजून पूर्ण झालेले नाही, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या आधारे चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ आणि ३३ अंतर्गत गुन्हा क्रमांक १४३/२०२५ नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस विभाग करत असून अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.