( रत्नागिरी / वार्ताहर )
ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षी (जि. रत्नागिरी) या संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘नॅशनल एक्सलंट सोशल अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्या वतीने आयोजित ‘युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळा – डोंबिवली २०२६’ या कार्यक्रमात नवनिर्मिती फाउंडेशनची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री गणेश संस्थान, रेल्वे स्टेशनजवळ, डोंबिवली (पूर्व) येथे हा सोहळा पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने सचिव राजेश आंबेकर आणि निलेश जाधव यांनी हा सन्मान स्वीकारला.
नवनिर्मिती फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, रक्तदान आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांमध्ये संस्था सातत्याने कार्यरत आहे.
ग्रामीण भागातील गरीब आणि कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने संस्थेमार्फत अंबेड बुद्रुक येथे न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल चालविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कामही संस्थेकडून केले जाते.
शैक्षणिक कार्याबरोबरच गरजू ज्येष्ठ नागरिकांना नियमितपणे धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्यविषयक उपक्रम, महिला व युवकांसाठी विविध कार्यक्रम तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य अशा माध्यमांतून संस्थेने सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागातून सुरू झालेल्या या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे, ही संस्थेसाठी महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. हा पुरस्कार केवळ संस्थेचा सन्मान नसून, नवनिर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, हितचिंतक आणि संस्थेला सहकार्य करणाऱ्या दात्यांच्या योगदानाचाही गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या राष्ट्रीय सन्मानामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळणार असून, आगामी काळात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि समाजातील गरजू घटकांच्या विकासासाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा संस्थेचा मानस आहे. नवनिर्मिती फाउंडेशनला मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.


