(रत्नागिरी / मिलिंद बनप)
हौशी नाट्यकलावंतांना आपल्या अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात आज, सोमवार १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरीतील काही नव्या दिग्दर्शकांनी प्रथमच राज्य नाट्य स्पर्धेच्या रिंगणात प्रवेश केला असून, त्यांच्या नाट्यप्रयोगांकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.
शिरगाव येथील हौशी रंगभूमीवरील कलाकार संदीप शेट्ये हे खल्वायन संस्थेच्या ‘दी अनॉनिमस’ या नाटकाचे दिग्दर्शन करीत आहेत. रत्नागिरीतील अनुभवी दिग्दर्शक ओंकार पंडित हेही प्रथमच विठ्ठल रखुमाई देवस्थान, पाथरट या संस्थेच्या ‘लाईफलाईन’ या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत.
ओम साई गणेश प्रतिष्ठान, मिरजोळे ही संस्था यंदा ‘स्वप्नपंख’ या नाटकाद्वारे स्पर्धेत सहभागी होत आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रत्नागिरीतील युवा कलाकार सुयोग बेंडल यांनी सांभाळली आहे. तसेच कुसुमेश्वर क्रीडा मंडळ, कोतवडे यांच्यावतीने दिग्दर्शक जनार्दन पेडणेकर ‘सूर राहू दे’ हे नाटक सादर करणार आहेत.
नवोदित दिग्दर्शकांच्या प्रयोगांसोबतच राज्य नाट्य स्पर्धेत अनेक वेळा विजेतेपद आणि अभिनयाची अनेक रौप्यपदके पटकावणाऱ्या समर्थ रंगभूमीचाही सहभाग यंदा लक्षवेधी ठरणार आहे. या संस्थेचे दिग्दर्शक ओंकार पाटील ‘दैवायत्तम कुले जन्म’ हे नाटक सादर करणार आहेत.
याशिवाय अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणारे अनुभवी नाट्यकलावंत आणि दिग्दर्शक लक्ष्मीकांत भाटकर, शेखर मुळये, दशरथ रांगणकर आणि संदेश तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेली ‘व्हायरल आजोबा’, ‘षडयंत्र’, ‘मेला तो शेवटचा होता’, ‘फक्त एकदा वळून बघ’ ही नाटकेही यंदाच्या स्पर्धेची विशेष आकर्षणे ठरणार आहेत. या दिग्दर्शकांना यापूर्वी अनेक रौप्यपदके मिळाली आहेत.
यंदाच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरीतील अनेक स्थानिक नाट्यसंस्थांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे नवोदित आणि अनुभवी दिग्दर्शकांच्या नाट्यप्रयोगांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. स्थानिक कलाकारांच्या सहभागामुळे यंदाच्या स्पर्धेला नाट्यरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


