(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल हे महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असून, तालुक्यातील क्रमांक दोनची बाजारपेठ म्हणून त्याची ओळख आहे. या गावासाठी दोन तलाठी कार्यालये आणि एक मंडळ अधिकारी कार्यालय अशी तीन शासकीय कार्यालये मंजूर करण्यात आली आहेत. या कामांना कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये अपूर्वा सामंत यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले. मात्र, नोव्हेंबर २०२६ उजाडूनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नसल्याने पाचल परिसरातील नागरिक आश्चर्य आणि नाराजी व्यक्त करीत आहेत.
राजापूर तालुक्यात एकूण ६१ तलाठी कार्यालये आणि ११ मंडळ अधिकारी कार्यालये मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश कार्यालयांची कामे पूर्ण झाली आहेत. असे असताना पाचलमधील तीन कार्यालयांच्या बांधकामाचा प्रश्न अद्याप प्रलंबित राहिल्याने स्थानिक नागरिकांकडून याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तलाठी कार्यालयांच्या बांधकामाचे मुख्य कंत्राट निर्माण कन्स्ट्रक्शन यांच्याकडे, तर मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कामाचे मुख्य कंत्राट श्रीमाता कन्स्ट्रक्शन यांच्याकडे आहे. राजापूर तालुक्यातील काही कामे स्थानिक ठेकेदारांना सबलेट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पाचलमधील कार्यालयांच्या बांधकामाची जबाबदारीही स्थानिक ठेकेदाराकडे सोपविण्यात आली आहे.
जून २०२५ मध्ये जुनी इमारत निर्लेखित करण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. बांधकामाचा टाइप प्लॅनही नव्याने रीडिझाइन करण्यात आला. एवढी प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून कामाचा आढावा घेतला जात असताना स्थानिक ठेकेदाराकडून विविध तांत्रिक अडचणींची कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे बांधकाम सुरू होण्यास नेमका विलंब कशामुळे होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदारांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. वारंवार विलंब होऊनही विभागाकडून कारवाई का केली जात नाही? ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांमध्ये काही साटेलोटे आहे का, असा संशयही आता नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. मंजूर निधी, कार्यारंभ आदेश आणि भूमिपूजन होऊनही तीन शासकीय कार्यालयांची बांधकामे रखडण्यामागचे नेमके कारण काय, याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने खुलासा करून कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी पाचल परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


