(राजापूर / तुषार पाचलकर)
विलवडे रेल्वे स्थानकावर अधिक गाड्यांना थांबा मिळावा, दुसऱ्या फलाटाची उभारणी करावी, प्रतीक्षालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प बांधण्यात यावा, या विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ प्रवाशांच्या सोयीसाठी रॅम्पच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, उर्वरित कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी दिली.
विलवडे रेल्वे स्थानकावर विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेने २० सप्टेंबर २०२६ रोजी लाक्षणिक उपोषण केले होते. या स्थानकावर अवलंबून असलेल्या ७२ गावांतील प्रवासी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या या उपोषणादरम्यान प्रशासनाने संघटनेच्या मागण्या मान्य करून पुढील पंधरा दिवसांत त्याबाबतचे लेखी पत्र देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार पंधरा दिवसांच्या आत सकारात्मक पत्र देण्यात आले. त्यापुढे प्रत्यक्ष क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून काही कामे सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार दिव्यांग आणि वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्पच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधकांची भेट घेतली. यावेळी सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच प्रतीक्षालय आणि दुसऱ्या फलाटाच्या उभारणीसह अन्य प्रलंबित मागण्यांचाही लवकरात लवकर पाठपुरावा करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विलवडे स्थानकाच्या विकासासाठी प्रवासी संघटनेने केलेल्या मागण्या योग्य असल्याचे सांगत, प्रतीक्षालय आणि दुसऱ्या फलाटाच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. तसेच एप्रिल महिन्यात यासंदर्भात समाधानकारक बातमी मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या भेटीदरम्यान प्रवासी संघटनेचे सल्लागार सुभाष लाड, मुंबई कार्याध्यक्ष रमेश काटकर, स्थानिक सरचिटणीस दीपक तोरसकर, तसेच सुरेश शिगम, शशिकांत खामकर, प्रकाश तोरसकर आणि विजय काटकर उपस्थित होते. यावेळी विलवडे रेल्वे स्थानकाच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
विलवडे रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. संघटनेच्या पाठपुराव्याला रेल्वे प्रशासनाकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे परिसरातून संघटनेच्या कार्याचे तसेच प्रशासनाच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.


