( मुंबई )
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा जाहीर केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (डीए), घरभाडे भत्ता (एचआरए) आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ करण्याची घोषणा केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा विचार करून महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. तसेच, घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली असून, यापूर्वी मिळणारा ८, १६ आणि २४ टक्के एचआरए वाढवून अनुक्रमे १०, २० आणि ३० टक्के करण्यात आला आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आल्याची घोषणाही सरनाईक यांनी केली.
विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला असतानाच सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आंदोलनापूर्वीच कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
विधानसभेत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, “कालच एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही सुधारित महागाई भत्ता आणि अन्य लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.”
या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून, महागाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

