(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील तरुण गजानन रमेश नार्वेकर यांनी रक्तदानाच्या माध्यमातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. मुंबईत शासकीय सेवेत कार्यरत असतानाही त्यांनी आतापर्यंत तब्बल ११२ वेळा रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन दिले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
वयाच्या ४० व्या वर्षीही नार्वेकर यांची सेवा अखंड सुरू आहे. नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही कुठल्याही वेळी रक्ताची गरज भासल्याचा फोन आला, की ते स्वतःच्या खर्चाने तत्काळ संबंधित ठिकाणी पोहोचतात. वेळ, अंतर किंवा परिस्थिती यांचा विचार न करता मदतीसाठी धाव घेणे हेच त्यांचे वैशिष्ट्य बनले आहे.
‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगट असलेल्या नार्वेकर यांनी अनेक आपत्कालीन प्रसंगांत मोलाची भूमिका बजावली आहे. एका गंभीर रुग्णासाठी तातडीने रक्ताची गरज निर्माण झाल्याची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात धाव घेतली आणि रक्तदान करून त्या रुग्णाचे प्राण वाचवले. अशा अनेक प्रसंगांत त्यांनी वेळेवर मदत करून जीवदान दिले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल विविध स्तरांवर सन्मान झाला असला, तरी ते प्रसिद्धीपासून दूर राहून निस्वार्थीपणे सेवा करत आहेत.
रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करताना ते सांगतात, “एकदा रक्तदान केल्यानंतर साधारण तीन महिन्यांनी पुन्हा रक्तदान करता येते. योग्य अंतर ठेवून केलेले रक्तदान पूर्णपणे सुरक्षित असून समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आपल्या रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचत असतील, तर प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले आहे. माझ्या रक्तामुळे ११२ जणांना जीवनदान मिळाले, हे माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी रक्तदान करत राहणार, असे ते ठामपणे सांगतात.
गजानन नार्वेकर यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे रक्तदान चळवळीला नवी उभारी मिळत आहे.

