( ठाणे )
ठाण्यातील मुंब्रा परिसरात मैत्रीचे नाते रक्तरंजित वैरात बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘तू मोठा भाई की मी मोठा भाई’ या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृताची ओळख लपवण्यासाठी त्याचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करून मृतदेह जंगलात फेकण्यात आला. या प्रकरणाचा छडा लावत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-4 ने दोन आरोपींना अटक केली असून, मृताचे शीर आणि हत्येत वापरलेले शस्त्र शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे पोलिसांच्या माहितीनुसार, खर्डी गावाजवळील निर्जन परिसरात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात वेगळे करण्यात आल्यामुळे मृताची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपला मित्र अमन मुस्कीन शेख याची हत्या केल्याची कबुली दिली.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, 13 मार्चच्या रात्री मुंब्र्यातील खर्डी गाव परिसरात अमन शेख आणि फैज मलिक यांच्यात ‘मोठा भाई कोण?’ या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी फैजने जवळील धारदार चाकूने अमनच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या अमनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धतीचा अवलंब केला. मृताची ओळख पटू नये म्हणून त्याचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे केले आणि शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. मृतदेह जंगलातील निर्जन भागात टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी संपूर्ण हत्याकांडाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला होता. पोलिसांनी संबंधित मोबाईल जप्त केला असून, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी फैज सुलतान मलिक याच्यावर यापूर्वी हत्या, अपहरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर मृत अमन शेख याच्यावर चोरी आणि मारामारीसारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून मृताचे शीर, हत्येत वापरलेले शस्त्र आणि इतर महत्त्वाचे पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे.

