(संगमेश्वर /एजाज पटेल)
उक्षी व संगमेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान साखळकोंड येथे रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृत इसम हा मध्यप्रदेश राज्यातील नन्ना भाई नावाच्या व्यक्तीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.०० ते २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजण्याच्या दरम्यान पोल क्रमांक १७५/२६ येथे घडली.
प्राथमिक माहितीनुसार संबंधित इसम रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करताना रेल्वे ट्रॅकवर त्याचा मोबाईल फोन आढळून आला. मोबाईलमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला.
मानसिंग नावाचा नातेवाईक संगमेश्वर येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ०७/२०२६ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार ए. बी. वानरे करीत आहेत.

