(चिपळूण)
तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे नमनाच्या कार्यक्रमादरम्यान बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत संतोष पांडुरंग चिनकटे (वय ४०, रा. कुटरे चिंचवाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास गावातील सहाणेजवळ नमनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी आकाश चंद्रवदन जगदाळे यांनी नमन करणाऱ्या कलाकारांना बक्षीस म्हणून काही रक्कम दिली होती. मात्र त्या बक्षिसाची रीतसर पुकारणी करण्यात आली नाही, यामुळे आकाश जगदाळे संतप्त झाले. त्यातून नमन करणाऱ्या मंडळींशी त्यांची बाचाबाची झाली.घटनास्थळी उपस्थित असलेले संतोष चिनकटे यांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आकाश जगदाळे यांना बाजूला नेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याचाच राग मनात धरून आकाश जगदाळे व चंद्रवदन सखाराम जगदाळे यांनी संतोष चिनकटे यांना गाठून त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत संतोष यांच्या नाकावर, तोंडावर व छातीवर जोरदार प्रहार करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर १० मार्च रोजी रात्री सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

