( पनवेल )
मुंबई–गोवा महामार्गावर पनवेल–पेण दरम्यान सोमवारी (दि. 22) दुपारी झालेल्या भीषण अपघातात डोलघर येथील विद्या विठ्ठल गायकर (वय 51) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट बलकरने ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बलकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल गायकर आणि त्यांची पत्नी विद्या गायकर हे कामानिमित्त पनवेल तहसीलदार कार्यालयात गेले होते. दुपारी सुमारे पावणे दोनच्या सुमारास काम आटोपून ते पळस्पेकडून पेणकडे जाणाऱ्या महामार्गाने स्कुटीवरून जात असताना ‘क्षणभर विश्रांती’ हॉटेलसमोर अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या सिमेंट बलकरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी विद्या गायकर यांना मृत घोषित केले. विठ्ठल गायकर यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

