(देवरूख / प्रतिनिधी )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV), दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये (RCRS) व कृषी महाविद्यालय, दापोली येथील बळिराजा ग्रुपच्या कृषीदूतानी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाअंतर्गत , ग्रामपंचायत गोळप येथे गावातील महिला शेतकरी यांच्यासाठी बीजांचे विविध वर्ग व बीज टॅगचे महत्त्व याविषयी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून माहिती दिली.
या प्रात्यक्षिकात बीज वर्गीकरण –न्युक्लिअस, ब्रीडर, फाउंडेशन आणि सर्टिफाईड बीज याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक वर्गासाठी वापरण्यात येणारे टॅग (टॅगचे रंग व त्यावरील माहिती) याचे महत्त्व महिला शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. प्रा. डॉ. यू. बी. पेठे सर तसेच. डॉ. किरण माळशे सर आणि डॉ. संतोष वानखेडे सर (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये) यांनी मार्गदर्शन केले.
या प्रात्यक्षिकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिला शेतकऱ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण बियाण्याविषयी जागरूकता निर्माण करणे होय. अनेक वेळा शेतकरी बाजारातून प्रमाणबाह्य किंवा चुकीचे बियाणे खरेदी करून आर्थिक नुकसान पत्करतात. त्यामुळे बीज वर्गीकरण, टॅग ओळख व प्रमाणित बियाण्यांची निवड याचे शास्त्रोक्त ज्ञान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
या उपक्रमातून कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग अधिक सक्रीय आणि सक्षम करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला. महिलांचा शेतीत व बीज व्यवस्थापनात वाढता सहभाग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी बळकटीचा दुवा ठरत असून, अशा प्रशिक्षणांमुळे महिला शेतकरी आत्मनिर्भर व निर्णयक्षम बनतात. यामुळे ‘कृषी क्षेत्रातील महिला सशक्तीकरण’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरते.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन जयदीप जोशी, विश्वजीत मालप, आदित्य खराटे, गौतम काळात, संकेत लेंगरे, ऋतिक मेंगे, उदयसिंह खिलारे, सोहम कदम आणि नितीश गोळे या बळिराजा ग्रुपच्या कृषीदूतानी केले. या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना बीजांची ओळख पटवून भविष्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी लाभ व्हावा हा उद्देश होता. गोळप येथील मार्गदर्शनाला अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या.