(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यात नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत असलेला २३ वर्षीय राहुल सुमित मिश्रा गेल्या महिनाभरापासून बेपत्ता आहे. ७ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांशी नेहमीप्रमाणे संवाद साधल्यानंतर त्याचा अचानक संपर्क तुटला. लोणावळ्यातील पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे परिसरातील निनी पॉईंट येथे त्याची दुचाकी, मोबाइल, बॅग आणि चपला आढळून आल्या; मात्र राहुलचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेमुळे नागपूरच्या मानेवाडा परिसरातील गुरुकुंज नगरातील विज्ञान नगर येथे राहणाऱ्या मिश्रा कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. एकुलत्या एका मुलाच्या सुखरूप परतण्याची प्रतीक्षा आई-वडील करत आहेत.
राहुल पुण्यातील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरी करत होता. कामानिमित्त तो पुण्यात पीजीमध्ये राहत असला, तरी घरच्यांशी त्याचा नियमित संपर्क होता. ७ ऑक्टोबर रोजीही त्याने कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता. यावेळी आपण गगनगिरी आश्रमात गेलो होतो, असे त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि कुटुंबीयांशी संपर्क पूर्णपणे तुटला. सुरुवातीला कामाच्या व्यस्ततेमुळे तो संपर्क करू शकला नसेल, अशी शक्यता गृहीत धरून घरच्यांनी त्याच्या फोनची प्रतीक्षा केली.
दरम्यान, लोणावळ्यातील पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील निनी पॉईंट परिसरात राहुलची मोटारसायकल निर्जन ठिकाणी आढळली. त्याच ठिकाणी त्याचा मोबाइल, बॅग आणि चपलाही सापडल्या. मात्र, या वस्तू मिळाल्यानंतरही राहुल कुठे आहे, याचा कोणताही ठोस मागमूस लागलेला नाही. दुचाकी निर्जनस्थळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी राहुलच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.
या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर राहुलचा शोध घेण्यासाठी दोन वेळा शोधमोहीम राबविण्यात आली. परिसरात तपास करूनही तो सापडला नाही. जखमी अवस्थेतही तो कुठे आढळून आलेला नाही. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात राहुल बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून मिश्रा कुटुंबीय राहुलचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचा ठावठिकाणा समजावा यासाठी विविध शक्यता तपासल्या जात आहेत. मात्र, दिवसागणिक प्रतीक्षा वाढत असून राहुलसोबत नेमके काय घडले, तो कुठे गेला आणि सध्या सुखरूप आहे का, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. एकुलत्या एका मुलाच्या अचानक बेपत्ता होण्याने आई-वडील आणि आजी व्याकूळ झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून राहुलचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.


