(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
रस्ते अपघातात एखादी व्यक्ती जखमी झाल्यानंतर उपचारांचा खर्च हा कुटुंबासमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण करतो. अशा परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार मिळावेत आणि आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी भारत सरकारने PM-RAHAT ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र अपघातग्रस्तांना सात दिवसांच्या उपचारांसाठी १.५० लाख रुपयांपर्यंत कॅशलेस मदत मिळू शकते. मात्र, ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या हातात दिली जात नाही, तर उपचार करणाऱ्या रुग्णालयाला सरकारकडून दिली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि कालमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे.
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते. PM-RAHAT या योजनेचे पूर्ण नाव प्राईम मिनिस्टर रोड एक्सीडेंट विक्टीम्स हॉस्पिटलायझेशन अँड अश्यूअर्ड् ट्रीटमेंट असे आहे. यापूर्वी ही योजना कॅशलेस ट्रीटमेंट ऑफ रोड एक्सीडेंट विक्टीम स्कीम या नावाने ओळखली जात होती. रस्ते अपघातात जखमी झालेल्या पात्र व्यक्तीला या योजनेतून सात दिवसांपर्यंतच्या उपचारांचा खर्च मिळू शकतो. मात्र, त्यासाठी आर्थिक मदतीची कमाल मर्यादा १.५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा खर्च मर्यादेपलीकडे गेल्यास पुढील उपचारांसाठी लागणारी रक्कम संबंधित अपघातग्रस्ताला स्वतः भरावी लागू शकते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातग्रस्त व्यक्ती श्रीमंत आहे की गरीब, याचा विचार केला जात नाही. संबंधित व्यक्ती योजनेच्या निकषांनुसार पात्र असणे आवश्यक आहे. मात्र, उपचारासाठी शासनाने नियुक्त केलेल्या रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक आहे. या रुग्णालयांना शासनाच्या पूर्वपरवानगीची वाट न पाहता अपघातग्रस्तावर तातडीने उपचार सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर पात्र रुग्णाच्या उपचारांचा खर्च सरकारकडून कॅशलेस पद्धतीने संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा केला जातो.
अपघात घडलेल्या ठिकाणाजवळ योजनेअंतर्गत नियुक्त रुग्णालय उपलब्ध नसेल, तर अपघातग्रस्ताला सुरुवातीला जवळच्या कोणत्याही रुग्णालयात दाखल करून तातडीचे उपचार देता येतात. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला योजनेतील नियुक्त रुग्णालयात हलवले जाते.
या योजनेत अर्ज करण्यासाठी अपघाताच्या स्वरूपानुसार वेगवेगळी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सामान्य अपघाताच्या प्रकरणात २४ तासांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे, तर जीवाला धोका असलेल्या अपघातग्रस्तांसाठी ही मुदत ४८ तासांची आहे. निर्धारित वेळेत अर्ज न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. पात्रता निश्चित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला सात दिवसांच्या उपचारांसाठी कमाल १.५० लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस सुविधा मिळते.
PM-RAHAT योजनेचा लाभ मिळवण्याची प्रक्रिया अपघात घडल्यानंतर सुरू होते. सर्वप्रथम ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा लागतो. त्यानंतर जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते. तेथे TMS 2.0 प्रणालीवर अपघातग्रस्ताची नोंदणी करून ट्रीटमेंट आयडी तयार केली जाते. पुढे पोलिसांकडून तपासणी केली जाते. या प्रक्रियेत संबंधित अपघातग्रस्त योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरल्यास त्याच्या उपचारांसाठी सरकारकडून कॅशलेस आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे अपघातानंतर तातडीचे उपचार मिळवताना आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पात्र नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.


