(मुंबई / वृत्तसंस्था)
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपाताची शक्यता आहे का आणि त्यामध्ये सुनील तटकरे यांचा काही संबंध होता का, याची तपासणी व्हावी, अशी भूमिका कदम यांनी मांडली. त्यांच्या आरोपांना सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळले असून रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस पाठविण्याचा इशारा दिला आहे.
जानेवारी महिन्यात विमान कोसळून अजित पवार यांचे अपघाती निधन झाले होते. या दुर्घटनेची चौकशी सुरू असून हा केवळ अपघात होता की त्यामागे घातपात होता, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. तटकरे हे अजित पवार यांच्या जवळचे का होते, असा सवाल उपस्थित करत अपघातातील संभाव्य घातपाताच्या अनुषंगाने त्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते का, असा प्रश्न पत्रकारांनी कदम यांना विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी तटकरे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. “तटकरे हे कोणाचे होऊ शकत नाहीत. मी हात जोडून सांगतो, हे मी आधीही सांगितलं आहे. सुनील तटकरे हे अंतुले साहेबांचे पीए होते. अंतुले साहेबांनाही तटकरे यांनीच संपवलं. जो जो माणूस तटकरेंना जवळ घेतो, त्यालाच संपवण्याचं काम तटकरे करतात. त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. मग अजित पवारांच्या घातपातात यांचाच हात होता का हा संशय निर्माण होतोय. त्या दृष्टीनेही चौकशी झाली पाहिजे. यांची राक्षसी महत्त्वांकाक्षा आहे, ते काहीही करू शकतात”, असे कदम म्हणाले.
तटकरे यांच्यावर आरोप करताना रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचाही संदर्भ दिला. सुनील तटकरे हे पूर्वी अंतुले यांचे स्वीय सहायक होते, असा उल्लेख करत अंतुले यांच्याबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले. तटकरे यांना जवळ करणाऱ्या नेत्यांबाबत पुढे अडचणी निर्माण होतात, असे विधानही कदम यांनी केले. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांना उपमुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, रामदास कदम यांच्या आरोपांनंतर सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्यावरील आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध करत त्यांनी कदम यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. “याचा मी तीव्र शब्दात मी निषेध करतो. रामदास कदमांची मानसिक स्थिती पाहता त्यांना ठाण्यापेक्षा आग्र्याला मानसिक स्थिती तपासणीला पाठवावे. अंतुलेंबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. यासंदर्भात कायदेशीर नोटीस त्यांना मी पाठवणार असल्याचे” सुनील तटकरे म्हणाले. रामदास कदमांनी त्यांच्या विधानांवर ठाम राहावे. जेणेकरून त्यांना कायदेशीर उत्तर द्यावे लागेल. मी कुणाचा आहे की नाही याबाबत रायगडच्या जनतेला माहिती आहे. कारण जनतेने मला 40 वर्ष सातत्याने निवडून दिलं आहे. परंतु, पराभूत झाल्यानंतर तुम्ही पुन्हा उभे राहिला नाहीत, असा टोला तटकरे यांनी रामदास कदम यांना लगावला.
आपल्यावर आरोप करण्यापूर्वी रामदास कदम यांनी अनिल परब यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले. आपली राजकीय पार्श्वभूमी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना माहिती असल्याचे सांगताना राजकीय पार्श्वभूमीचा अर्थ वेगवेगळा असतो, असे त्यांनी नमूद केले. कोणाची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, हे सर्वांना माहीत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी तटकरे यांनी जुन्या राजकीय घडामोडींचा दाखला देत रामदास कदम यांच्यावरही आरोप केला. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि मुंडे यांचे विरोधी पक्षनेते पदाचे पत्र दिले, त्यावेळी रामदास कदम आपल्या बंगल्यावर आले होते, असा दावा त्यांनी केला. “रामदास कदम माझ्या बंगल्यावर आले आणि हातापाया पडले. हे खरं की खोटं त्यांनी त्यांच्या जागृत देवस्थानाला स्मरुन सांगावे,” असे आव्हान तटकरे यांनी दिले.
रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि कोकणातील राजकीय वर्चस्वाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद राहिले आहेत. अलीकडेच खेडमधील पोयनार धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमातील आसनव्यवस्थेवरूनही वाद निर्माण झाला होता. या कार्यक्रमात कदम यांनी तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. आता अजित पवार यांच्या विमान अपघातावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने महायुतीतील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.


