(देवळे / प्रकाश चाळके)
ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडत सामाजिक बांधिलकी जपणारे संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावचे सुपुत्र आणि पत्रकार सिकंदर युसुफ फरास यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. पर्यावरण, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’ या संस्थेच्या वतीने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
आपल्या लेखणीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने मांडणारे सिकंदर फरास यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संगमेश्वर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या व्यथा, दुर्गम गावांमधील पायाभूत सुविधांचा अभाव, रस्ते, वीज, पाणी तसेच प्रशासकीय दिरंगाई यांसारख्या प्रश्नांना त्यांनी आपल्या निःपक्षपाती पत्रकारितेतून वाचा फोडली आहे.
केवळ बातम्यांच्या माध्यमातून समस्या उजेडात आणण्यापुरते मर्यादित न राहता, संबंधित प्रश्नांची प्रशासकीय स्तरावर सोडवणूक होण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सामाजिक बांधिलकी, निर्भीड भूमिका आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’ संस्थेने त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पत्रकारिता, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


