(छत्रपती संभाजीनगर)
जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सार्वत्रिक बदली प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. स्वतःचा विषय बदलून खोटी माहिती भरल्याच्या गंभीर आरोपांवर मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी नऊ शिक्षकांना तात्काळ निलंबित केले आहे. CEO अंकित यांनी जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे प्राथमिक शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे साडेआठ हजार शिक्षक कार्यरत असून यंदाची बदली प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली होती. संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मधील शिक्षकांना पोर्टलवर स्वतःची शैक्षणिक माहिती भरावी लागते. मात्र चौकशीत काही शिक्षकांनी आपला विषय बदलून दाखवत इच्छित ठिकाणी बदली मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये साडेआठ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. यंदाची सार्वत्रिक बदली प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. त्याआधी संवर्ग-1 आणि संवर्ग-2 मधील बदल्यांसाठी शिक्षकांकडून पोर्टलवर शैक्षणिक व सेवा संबंधित माहिती मागविण्यात आली होती.
मात्र पडताळणीत अनेक शिक्षकांनी बदल्यास अनुकूल ठरणारी चुकीची किंवा खोटी माहिती भरल्याचे उघड झाले. या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सविस्तर पडताळणी केली. संबंधित अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या समोर सादर करण्यात आला.
तपासात काही शिक्षकांनी शाळांमधील अंतर जाणीवपूर्वक चुकीचे दर्शविले, तर काहींनी रुजू होण्याची तारिख खोटी नमूद केली होती. काहींनी तर परस्पर विषय बदल दाखवून पोर्टलवरील नोंदी चुकीच्या प्रकारे सादर केल्याचेही आढळले.
या सर्व अनियमितता गंभीर स्वरूपाच्या मानत मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी नऊ शिक्षकांना तत्काळ निलंबित केले. बदल्यांसाठी खोटी माहिती दिल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने १८ जून २०२४ रोजीच दिले आहेत. त्याच आदेशाच्या अधारे ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निलंबित केलेले शिक्षक: रवींद्र धर्मा जाधव, भाग्यशाली भास्कर जगताप, जयश्री मारोती कस्तुरे, अलमास फातेमा हसन खान, सुरेखा काशिनाथ वाघ, अंजली नारायण महाजन, आऐशा सुलताना खान, निसार फातेमा जुबेर अहमद, कविता सुरेश अंबुसे
या शिक्षकांना तात्काळ मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून निलंबन काळात केवळ निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन कायम राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन बदली प्रक्रियेत झालेल्या या अनियमिततेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी चर्चा रंगली असून पुढील चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

