(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पोलिसांचा गणवेश परिधान करून पोलीस अधिकारी असल्याचे भासवायचे, व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करून अटकेची आणि बदनामीची धमकी द्यायची आणि तपासाच्या नावाखाली लाखोंची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वळती करायची, असा सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार लांजा तालुक्यात उघडकीस आला आहे. पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक येथून बोलत असल्याची बतावणी करून एका ७८ वर्षीय महिलेला तब्बल ६० लाख रुपयांचा आर्थिक गंडा घालण्यात आला. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील शेवरवाडी येथील ७८ वर्षीय महिला फिर्यादी असून, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून संशयिताने त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता. आपण नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असून पोलीस अधिकारी असल्याचे भासवून त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. फिर्यादींच्या आधारकार्डचा वापर करून कॅनरा बँकेच्या मुंबई येथील शाखेत खाते उघडण्यात आल्याचे त्याने सांगितले. अब्दुल रेहमान नामक व्यक्ती विविध संघटनांकडून पैसे गोळा करून फिर्यादींच्या नावावरील या बँक खात्यात जमा करत असून, त्याबदल्यात फिर्यादींना १० टक्के कमिशन दिले जात असल्याचा गंभीर आरोपही त्याने केला. या कथित आर्थिक व्यवहारांमध्ये फिर्यादींचा सहभाग असल्याचे भासवत त्यांना अटक करण्याची तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी देण्यात आली.
या धमक्यांमुळे भयभीत झालेल्या फिर्यादींना संशयिताने तपासाच्या नावाखाली त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले. त्यानुसार ‘Punit Traders’ या नावाने असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला असून, अशा प्रकारे एकूण ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), २०४, २०५ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने ‘सुशांत पिसे’ असे नाव सांगितल्याचे तक्रारीत नमूद असून, त्याचे खरे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही.
गणवेश, पोलीस ठाण्याचे नाव आणि व्हिडीओ कॉलवरील अधिकाऱ्याचा चेहरा यांचा वापर करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा सायबर भामट्यांचा हा प्रकार गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून अटकेची भीती दाखवत लाखोंची रक्कम उकळली जात असल्याने नागरिकांनी अशा कॉलपासून सावध राहण्याची गरज आहे. कोणतीही तपास यंत्रणा तपासाच्या नावाखाली वैयक्तिक बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगत नाही.


