(गुहागर / रामदास गमरे)
बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था (मर्या.) या पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संत तुकाराम महाराज सभागृह, गुहागर बाजार, शृंगारतळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पतसंस्थेचे चेअरमन के. सी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सभेचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे चिटणीस महेंद्र महादेव मोहिते यांनी केले. त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या परिपत्रकाचे वाचन करून सभेत मांडण्यात येणाऱ्या विषयांचा गोषवारा उपस्थितांसमोर सादर केला. त्यानंतर सभेतील विविध विषय आणि प्रश्नांवर अहवाल मांडण्यात आला. सर्व विषयांवर सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.
लेखापरीक्षकांनी ३१ मार्च २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी तयार केलेला नफा-तोटा ताळेबंद अहवाल सभेत मांडण्यात आला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सभागृहात उपस्थित काही सभासदांनी सहकार विषयाशी संबंधित प्रश्न उपस्थित केले. संचालक मंडळाने या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत सभासदांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले. अहवालाच्या संदर्भात सभासदांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकही सभेत मांडण्यात आले आणि त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
या वेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील सखाराम जाधव, तज्ञ संचालक शैलेंद्र शांताराम पवार, संचालक संजय भिकाजी तांबे, संचालक रामदास धों. गमरे, संचालक संजय रामचंद्र पवार आणि संचालिका मनिषा महेंद्र जाधव यांनी आपले मौलिक विचार मांडून उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले.
पतसंस्थेने अवघ्या एक वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ‘बी’ ग्रेड प्राप्त केल्याबद्दल सभासदांनी संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचे आणि पारदर्शक कार्यप्रणालीचे कौतुक केले. पतसंस्था यापुढेही गतिमान आणि गतिशील पद्धतीने कार्यरत राहून सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवेल, असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला. भविष्यात संस्थेची अधिक प्रगती होऊन सभासदांच्या हिताला प्राधान्य देत पतसंस्थेचे कार्य सुरू राहावे, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग, खेळीमेळीचे वातावरण आणि संस्थेच्या प्रगतीबद्दल व्यक्त झालेला विश्वास यामुळे पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या पार पडली. सभा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच उपस्थित सभासदांचे आभार मानून ज्येष्ठ संचालक संजय भिकाजी तांबे यांनी सभेची सांगता केली.


