(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाच्या गाडीला मागून जोरदार धडक देऊन अपघात घडविल्यानंतर मदतीसाठी न थांबता कारचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना कुवारबाव येथे घडली. या अपघातात हर्ष सुनील लाखण हा तरुण जखमी झाला असून, त्याच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे, तर छातीला मुका मार लागला आहे. ही घटना ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास पाटबंधारे कॉलनीसमोरील कंचन हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिठ्यावर घडली.
याबाबत हर्ष सुनील लाखण (वय १९, सध्या रा. विंद्रनगर, कुवारबाव, मूळ रा. शेणवडे, ता. संगमेश्वर) याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, हर्ष हा आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या एक्स्ट्रीम १२५ दुचाकीवरून (क्रमांक एमएच ०८ बीएल ३६१३) कुवारबाव येथील पाटबंधारे कॉलनीसमोरील कंचन हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिठ्यावर आला होता. तेथून तो दुचाकी एमआयडीसी रत्नागिरीच्या दिशेने वळवत असताना रत्नागिरीकडून हातखंब्याच्या दिशेने जाणाऱ्या हुंडाई आय-१० कारने (क्रमांक एमएच ०८ एजी २८५५) त्याच्या दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिली.
कारचालक नरेश मंगेश केळसकर (वय ३५, रा. ओगलेवाडी, ता. राजापूर) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व भरधाव वेगाने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. धडकेमुळे हर्षच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली असून छातीला मुका मार लागला. अपघातानंतर जखमी तरुणाच्या मदतीसाठी न थांबता कारचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कारचालक नरेश केळसकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १३४(ब) अन्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.२० वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


