(रत्नागिरी / वार्ताहर)
केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या विविध अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली.
या शिष्टमंडळात केंद्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर व महासचिव कमलाकर त्रिपाठी यांचा समावेश होता. चर्चेत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करणे, शिक्षकांवर गुन्हे दाखल करताना पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेणे, अनावश्यक गुन्हे नोंद न करणे, जनगणना व निवडणुका याशिवाय इतर कोणतीही प्रशासनिक कामे शिक्षकांकडून न घेणे, तसेच सर्व राज्यांतील शिक्षकांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आठवा वेतन आयोग लागू करणे या प्रमुख मागण्यांवर भर देण्यात आला.
या भेटीनंतर माहिती देताना अखिल भारतीय शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीपजी देवळेकर यांनी सांगितले की, शिक्षकांच्या हक्कांसाठी संघ सदैव कटिबद्ध आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतील.
फोटो : केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट देताना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर, महासचिव कमलाकर त्रिपाठी आणि अन्य पदाधिकारी.