(क्रीडा / वृत्तसंस्था)
भारतीय क्रिकेटमधील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीचा प्रवास थांबवत असल्याची माहिती दिली. शमीच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना निराशा झाली आहे. भारताकडून ६४ कसोटी सामने खेळताना त्याने २२९ बळी मिळवले आहेत.
कसोटी क्रिकेटमधील आपल्या प्रवासाला निरोप देताना शमीने भारतीय संघाची पांढरी जर्सी आणि तिच्याशी जोडलेल्या आठवणींबद्दल भावना व्यक्त केल्या. पहिल्यांदा भारतीय कसोटी जर्सी परिधान केली, तेव्हा देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचे एकच स्वप्न डोळ्यांसमोर होते, असे त्याने नमूद केले. त्यानंतर मिळालेली प्रत्येक विकेट, मैदानावरील संघर्ष, दुखापती आणि त्यातून केलेले पुनरागमन या प्रत्येक अनुभवाने आपल्याला काही ना काही शिकवले, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
कसोटी क्रिकेट हा केवळ खेळाचा एक प्रकार नसून आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे शमीने सांगितले. “आज जड अंतःकरणाने आणि असंख्य सुंदर आठवणींसह मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे,” अशा भावना त्याने व्यक्त केल्या. या प्रवासात साथ देणारे सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंबीय तसेच चांगल्या आणि कठीण काळात आपल्यावर विश्वास कायम ठेवणाऱ्या लाखो भारतीयांचे त्याने आभार मानले.
आपल्या क्रिकेटमधील प्रतिभेवर विश्वास ठेवून प्रगतीची संधी दिल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) यांचेही शमीने विशेष आभार मानले. या दोन्ही संस्थांचा पाठिंबा आणि विश्वास आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाचा राहील, असे त्याने म्हटले आहे. “माझा शेवटचा कसोटी चेंडू कदाचित मैदानावर टाकला गेला असेल; मात्र भारतासाठी खेळल्याचा अभिमान माझ्या हृदयात कायम जिवंत राहील,” अशा शब्दांत त्याने आपल्या पोस्टचा समारोप केला.
शमीने ६४ कसोटी सामन्यांत २२९ फलंदाजांना माघारी धाडले. ५६ धावांत ६ बळी ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०२३ मध्ये ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरला. भारतीय कसोटी संघासाठी दिलेल्या योगदानानंतर शमीने आता या प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.


