( मुंबई / वृत्तसंस्था )
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड काढण्याची घाई करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची (NCMC) अनिवार्यता पुढे ढकलण्यात आली असून, आता १ जानेवारी २०२७ पासूनच हे कार्ड सवलतीच्या प्रवासासाठी बंधनकारक असणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची घोषणा केली.
राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर २०२६ पासून सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, दुर्गम आणि ग्रामीण भागातील अनेक पात्र महिला लाभार्थ्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचली नसल्याने त्यांना कार्ड नोंदणी करता आलेली नाही. या अडचणी लक्षात घेऊन सरकारने कार्डसक्तीची मुदत वाढवली आहे.
या निर्णयासाठी विविध स्तरांतून मागणी करण्यात येत होती. प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, आमदार, खासदार तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्डसक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी सरकारकडे केली होती. या मागण्यांचा सकारात्मक विचार करून आता १ जानेवारी २०२७ पर्यंत कार्ड अनिवार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत १ कोटी १० लाख NCMC स्मार्ट कार्डांची अधिकृत नोंदणी करून त्यांचे प्रत्यक्ष वितरणही पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे. या माध्यमातून १०० टक्के नोंदणीचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कार्डसक्तीला मुदतवाढ मिळाल्याने ७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत NCMC कार्ड नसलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही एसटीच्या तिकिटातील सवलतीचा लाभ नेहमीप्रमाणे घेता येणार आहे. त्यामुळे या कालावधीत कार्ड नसल्यामुळे सवलत नाकारली जाणार नाही.
मात्र, ३१ डिसेंबरला मुदत संपण्यापूर्वी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि धावपळ टाळण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांनी जवळच्या एसटी आगारात किंवा गावात आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष नोंदणी शिबिरात सहभागी व्हावे आणि आपले NCMC स्मार्ट कार्ड वेळेत नोंदणीकृत करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.


