(बंगळुरू / वृत्तसंस्था)
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे वैवाहिक वादातून सात जणांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेखर ऊर्फ इंदुशेखर (वय ४५) या कॅब चालकाला या प्रकरणी राजाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने स्वतःची पत्नी सुनीता आणि तिच्या कुटुंबातील सहा जणांची दोन दिवसांत हत्या केल्याचा आरोप आहे. राजाजीनगर येथील राहत्या घरी एकेकाला बोलावून डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या हत्याकांडात आरोपीची पत्नी सुनीता, सासू रूपावती, मेहुणे शिवकुमार आणि शंकर, भावजया दिव्या आणि नलिनी तसेच शिवकुमारचा सात वर्षांचा मुलगा पुनीत यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी पुनीतचा मृतदेह चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स परिसरानजीक सापडला असून, अन्य सहा जणांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत.
या प्रकरणाचा उलगडा नलिनी बेपत्ता झाल्याने तिच्या आईने श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर झाला. तपासादरम्यान पोलिसांना शेखरच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याची चौकशी केली असता जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने सात जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
शेखर आणि सुनीता यांचा विवाह २० वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे दाम्पत्य राजाजीनगरमधील भाष्यम सर्कलजवळ एका इमारतीच्या गच्चीवरील लहानशा एक खोली आणि स्वयंपाकघर असलेल्या घरात राहत होते. सुनीता सतत माहेरच्या मंडळींच्या संपर्कात राहत असल्याने आरोपी नाराज होता. पत्नीच्या वागणुकीबाबत तो सासू आणि मेहुण्यांकडे तक्रार करत असे; मात्र ते प्रत्येक वेळी सुनीताची बाजू घेत असल्याची त्याची भावना होती. माहेरच्या मंडळींच्या या हस्तक्षेपाचा राग मनात धरून त्याने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने सर्वप्रथम पत्नी सुनीता हिची हत्या केली. त्यानंतर सासू आणि अन्य नातेवाइकांना राजाजीनगर येथील घरी काम असल्याचे सांगून बोलावून त्यांच्यावर हल्ला केला. शिवकुमार आणि शंकर या दोन्ही मेहुण्यांना पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांचीही हत्या करण्यात आली. दोन दिवसांच्या कालावधीत सात जणांची हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह कारमधून चिक्कबळ्ळापूर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हत्यांसाठी दगडाचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून, प्राथमिक माहितीनुसार डोक्यात वरवंटा घालून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच रक्ताचे डाग पुसण्यासाठी आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आरोपीने दाखवलेल्या ठिकाणांच्या आधारे पोलिसांनी नंदी हिल्सच्या पायथ्याशी सुमारे चार तास शोधमोहीम राबवली. या मोहिमेत सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह सापडला. मात्र, उर्वरित सहा जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. मृतदेहांची विल्हेवाट नेमकी कुठे लावण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी वेस्ट यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत. राजाजीनगर पोलीस उर्वरित मृतदेहांचा शोध घेत असून, या हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.


