(दापोली / वार्ताहर)
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पंचनदीच्या हरहुन्नरी आणि विद्यार्थिप्रिय मुख्याध्यापिका सौ. सविता सुकुमार मडिवाळ यांची शासनाच्या वतीने प्रतिष्ठेच्या ‘आयडॉल शिक्षिका’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची, अध्यापनातील कौशल्याची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या उपक्रमशीलतेची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे पंचनदी शाळेसह दापोली तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. मडिवाळ या विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून परिचित आहेत. अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्या सातत्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. विशेषतः इंग्रजी विषयावरील त्यांचे प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांना हा विषय सहज, सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्याचे त्यांचे कौशल्य उल्लेखनीय आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे आणि अध्ययन प्रक्रिया अधिक आनंददायी बनविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. मुख्याध्यापिका म्हणून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
त्यांच्या या कार्याची शासनस्तरावर दखल घेत ‘आयडॉल शिक्षिका’ म्हणून निवड झाल्याने त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव झाला आहे. या निवडीबद्दल शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षकवृंद, सहकारी, विद्यार्थी आणि पालकांकडून सौ. सविता सुकुमार मडिवाळ यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


