(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आगामी प्रकाशाचा सण अर्थात दिवाळी शांततेत, निर्भय आणि आनंददायी वातावरणात साजरी व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नागरिकांची सुरक्षा, बाजारपेठेतील कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांना चाप लावण्यासाठी आणि रत्नागिरीला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात विशेष सुरक्षा उपाययोजना आणि जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मुख्य बाजारपेठा, बस स्थानके, पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांवर पोलिसांची विशेष गस्त वाढवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात घरफोडी, जबरी चोरी, आणि सोनसाखळी चोरी (चेन स्नॅचिंग) यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी, आकर्षक ऑफर्स, बंपर डिस्काउंटच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच बँक खात्याची माहिती, OTP किंवा UPI पिन कोणासोबतही शेअर करू नये. दुर्दैवाने सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
अमली पदार्थ तस्करांवर होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’
तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईसोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीवरही भर दिला जात आहे.
पर्यावरणपूरक आणि सुरक्षित दिवाळीचे आवाहन
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत, हा सण सामाजिक सलोखा राखून, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहनअप्पर अधिक्षक बी बी महामुनी यांनी केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दल नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास तत्पर आहे.


