(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील दरडीवाडीच्या सौ. धनश्री दीपक दरडी यांनी सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘कोण होणार करोडपती?’ या ज्ञानाधारित कार्यक्रमात आपल्या बुद्धिमत्तेची, ज्ञानाची आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली. कार्यक्रमाच्या हॉट सीटवर स्थान मिळवत त्यांनी तब्बल साडेसात लाख रुपयांची रक्कम जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे नाणीज गावासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका माधुरी दीक्षित यांनी विचारलेल्या एकूण १५ प्रश्नांपैकी धनश्री यांनी ११ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. विशेष म्हणजे, एकाही लाईफलाईनचा आधार न घेता त्यांनी पाच लाख रुपयांचा टप्पा पार केला. त्यानंतर साडेसात लाख रुपयांची रक्कम जिंकल्यानंतर खेळातून माघार घेण्याचा निर्णय घेत त्यांनी आपला प्रवास थांबवला.
या कामगिरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोकण विभागातून ‘कोण होणार करोडपती?’च्या हॉट सीटवर स्थान मिळवणाऱ्या धनश्री या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे.
धनश्री दरडी या जयगड येथील जिंदल विद्या मंदिरमध्ये संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गायनाची विशेष आवड असून त्या उत्तम गायिकाही आहेत. कार्यक्रमादरम्यान त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त माधुरी दीक्षित यांच्यासमोर गायन सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सुरेल गायनामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
सोमवार आणि मंगळवार अशा सलग दोन दिवस या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. ज्ञानासोबतच आपल्या गायनकलेचीही छाप पाडत धनश्री दरडी यांनी मिळवलेले हे यश नाणीज गावासाठी अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.


