(दापोली / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाच्या गोविंदा संस्कृतीचा झेंडा मुंबईच्या प्रतिष्ठेच्या प्रो गोविंदा स्पर्धेत पुन्हा एकदा अभिमानाने फडकणार आहे. जालगाव-दापोली येथील हिंदुराज गोविंदा पथकाची Pro Govinda 2026 – Season 4 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी अंतिम १६ संघांमध्ये निवड झाली आहे. यंदा हे पथक ‘नवी मुंबई स्ट्राईकर्स’ या संघाच्या नावाने मैदानात उतरणार असून, कोकणातील एकमेव पथक म्हणून स्पर्धेत सहभागी होणार आहे.
मुंबईतील वरळी येथील Dome, SVP Stadium येथे २५, २६ आणि २७ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची Pro Govinda 2026 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नवी मुंबई स्ट्राईकर्सच्या माध्यमातून दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी हिंदुराज गोविंदा पथकाला मिळाली आहे.
हिंदुराज गोविंदा पथकाने गेल्या काही वर्षांत गोविंदा क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०२२ ते २०२५ या सलग चार वर्षांत आठ थर उभारण्याचा विक्रम या पथकाच्या नावावर आहे. दापोली प्रो गोविंदा स्पर्धेत २०२३ मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर २०२४ मध्ये पथकाने उपविजेतेपद मिळवले. त्यानंतर २०२५ मध्ये मुंबईत झालेल्या स्पर्धेत सहभागी होत पथकाने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या कौशल्याचे दमदार प्रदर्शन केले.
या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर हिंदुराज गोविंदा पथकाची यंदाही Pro Govinda 2026 च्या अंतिम १६ संघांमध्ये निवड झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी अंतिम १६ मध्ये स्थान मिळाल्याने दापोलीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि कोकणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा ‘नवी मुंबई स्ट्राईकर्स’ म्हणून मैदानात उतरणाऱ्या या कोकणच्या पथकाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गोविंदा पथकाच्या खेळाडूंच्या मेहनतीला आणि कौशल्याला आता मुंबईच्या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
दरम्यान, कोकणच्या या पथकाला मोठ्या संख्येने शुभेच्छा आणि पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Pro Govinda 2026 मधील सामने JioHotstar वर थेट पाहता येणार असल्याने कोकणवासीयांना आपल्या पथकाची कामगिरी घरबसल्या पाहता येणार आहे.

