(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ७६ पदवीधर शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या केंद्रप्रमुखांच्या पदांवर आता भर पडणार असून शैक्षणिक व्यवस्थेला दिलासा मिळाला आहे.
शालेय शिक्षण व्यवस्थेत केंद्रांतर्गत शाळांमध्ये पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून केंद्रप्रमुखांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, अध्यापन पद्धतींचे मार्गदर्शन करणे आणि शाळांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे ही जबाबदारी केंद्रप्रमुख पार पाडतात. जिल्ह्यात एकूण २५१ केंद्रप्रमुख पदे मंजूर असली, तरी यापैकी केवळ ४९ पदे कार्यरत होती. उर्वरित पदे रिक्त असल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाने दीर्घकाळ सातत्याने पाठपुरावा करत रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची मागणी लावून धरली होती. अखेर शिक्षण विभागाने समुपदेशन प्रक्रियेच्या माध्यमातून पात्र पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील १०५ पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख पदासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ७६ पदांसाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान चार शिक्षकांनी पदोन्नती नाकारली, तर ७६ जणांना केंद्रप्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली. उर्वरित २९ पात्र शिक्षकांना येत्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या जागांवर संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याचे समाधान व्यक्त करताना माजी जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी शिक्षण विभागाच्या निर्णयाचे स्वागत केले. या पदोन्नतीमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

