(मुंबई)
शिव संचार सेनेच्या वतीने आयोजित ‘संचार समिट २०२६’ या महत्त्वपूर्ण उपक्रमात युवासेना प्रमुख, माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अत्याधुनिक जॉब पोर्टलचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील तरुणांना तंत्रज्ञान व दळणवळण क्षेत्रातील संधींशी थेट जोडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या पोर्टलमुळे आयटी, टेलिकॉम, बँकिंग, मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रांतील रोजगार संधी थेट तरुणांपर्यंत पोहोचणार असून, स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
समिटमध्ये मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, नेटवर्क ऑपरेशन्स, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स, तसेच बँकिंग, मीडिया आणि जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. उद्योग क्षेत्रातील या व्यापक सहभागामुळे समिटला मोठे महत्त्व प्राप्त झाले. तसेच, डिजिटल युगात वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा विषयक जनजागृतीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. बदलत्या कम्युनिकेशन क्षेत्राच्या गरजेनुसार तरुणांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याचाही उपक्रमात समावेश होता.
या समिटला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा शिव संचार सेनेच्या रचनात्मक कार्याची पोचपावती मानली जात आहे. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

