(दापोली / वार्ताहर)
बँक ऑफ इंडियाच्या केळशी शाखेतील संयुक्त बचत खात्यातून परस्पर रक्कम हस्तांतरित करून ३ लाख ९९ हजार २२९ रुपये ७१ पैशांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १२ ऑक्टोबर २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने विविध ट्रान्झॅक्शन आयडींचा वापर करून खातेदाराच्या संमतीशिवाय ही रक्कम दुसरीकडे वळविल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी शैलेश गणपत सावंत (वय ४६ वर्षे, सध्या रा. शिवडी, मुंबई, मूळ रा. केळशी कांदेवाडी, ता. दापोली) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचे बँक ऑफ इंडियाच्या केळशी शाखेत जॉईंट सेव्हिंग खाते आहे. या खात्यातून संबंधित कालावधीत वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन आयडींच्या माध्यमातून एकूण ३ लाख ९९ हजार २२९ रुपये ७१ पैसे परस्पर ट्रान्सफर करण्यात आले. अज्ञात व्यक्तीने फसवणुकीच्या उद्देशाने आणि फिर्यादी यांच्या कोणत्याही संमतीशिवाय हा आर्थिक व्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतल्याचे लक्षात आल्यानंतर शैलेश सावंत यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गुन्हा रजिस्टर क्रमांक २३७/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.


