(मुंबई / वृत्तसंस्था)
विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरात एकाच भाड्याच्या फ्लॅटमध्ये तीन बहीण-भावांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कुमार मेहता (५०), दिपेश मेहता (५२) आणि खेवना मेहता (४८) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांनी विष प्राशन करून जीवन संपवले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी गुजराती भाषेत एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये आजारपण आणि आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची व्यथा मांडल्याचे तपासात समोर आले आहे.
हे तिघेही विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील ‘गार्डन एव्हेन्यू’ इमारतीच्या ‘डी’ विंगमधील फ्लॅट क्रमांक १२०३ मध्ये राहत होते. गुरुवारी बंद असलेल्या या फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना याबाबत कळवले. माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली.
फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता, तिन्ही भावंडांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू साधारणतः ३ ते ४ दिवसांपूर्वी झाला असावा, अशी माहिती बोळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
पोलिसांच्या तपासात या कुटुंबाच्या आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींची माहिती समोर आली आहे. हे तिघे २०२५ पासून संबंधित फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्यापैकी एका भावाला अर्धांगवायूचा त्रास होता, तर दुसरा भाऊ कर्करोगावरील उपचार घेत होता. आजारांवरील उपचारांचा वाढता खर्च आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते.
मृत्यूपूर्वी चित्रित केलेल्या गुजराती भाषेतील व्हिडिओमध्येही त्यांनी आजारपण आणि आर्थिक विवंचनेचा उल्लेख केल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या तिघांच्या दुसऱ्या बहिणीशी संपर्क साधला असता, त्यांना पैशांची मोठी अडचण होती आणि त्यांनी तिच्याकडेही आर्थिक मदतीची मागणी केली होती, अशी माहिती तिने दिली. या घटनेची बोळिंज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूमागील नेमकी कारणे स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


