( मुंबई )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पार्सल वाहतूक सेवेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कंत्राटदाराचा परवाना अचानक रद्द करण्यात आल्याने राज्यभरातील एसटी पार्सल सेवा ठप्प झाली असून हजारो व्यापारी, उद्योजक आणि सामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत.
शनिवार मध्यरात्रीपासून एसटी महामंडळाने पार्सल सेवा चालवणाऱ्या कंत्राटदाराचे कार्यालये ताब्यात घेतली आहेत. मात्र, नवीन व्यवस्था लागू होईपर्यंत सेवा कशी सुरू ठेवायची, याबाबत स्पष्टता नसल्याने संपूर्ण पार्सल प्रणाली विस्कळीत झाली आहे. राज्यात सुमारे 300 एसटी बसस्थानकांमधून पार्सल सेवा चालते. या सेवेसाठी खासगी कंत्राटदाराकडे दीड हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत होते. अचानक परवाना रद्द झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्यापारी आणि ग्राहकांचे मोठे नुकसान
एसटी पार्सल सेवेमुळे औद्योगिक माल, औषधे, महत्त्वाची कागदपत्रे आणि व्यावसायिक वस्तू वेळेवर पोहोचत होत्या. मात्र सेवा ठप्प झाल्याने राज्यातील व्यापार साखळीवर परिणाम झाला आहे. अनेक डेपोमध्ये पार्सल अडकून पडल्याने ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सेवा वापरणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता निर्णय घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने स्वीकार आणि वितरण दोन्ही प्रक्रिया ठप्प झाल्या आहेत.
परवाना रद्द का केला?
एसटी महामंडळाने मे. हेनेक्स इंटरनॅशनल टेक्नोलॉजीज प्रा. लि. या कंत्राटदाराची नियुक्ती 30 नोव्हेंबर 2027 पर्यंत केली होती. मात्र, अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यानंतर नवीन परवानाधारकाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या आदेशानुसार, नवीन कंत्राटदार नेमला जाईपर्यंत पार्सल कार्यालयांचा ताबा महामंडळाकडेच राहणार आहे.
तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यापारी संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. पार्सल सेवा लवकरात लवकर पूर्ववत करावी आणि स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून पुढे येत आहे. दरम्यान, या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील लॉजिस्टिक्स साखळीवर मोठा परिणाम झाला आहे.

