(गुहागर / वार्ताहर)
तालुक्यातील वेळंब घाडेवाडी येथील मराठी शाळा क्रमांक २ मध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार तयार करताना कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली. शाळेलगत असलेल्या किचन शेडमध्ये हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत विद्यार्थी सुरक्षित राहिले. स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक कुकरचा स्फोट झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. या वेळी मंगेश बारगोडे, विकास बारगोडे आणि रामचंद्र मापारले यांनी तत्परतेने पुढाकार घेत परिस्थिती हाताळली. स्फोटानंतर आगीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांनी गॅस सिलिंडरचा पाइप सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या धाडसामुळे संभाव्य धोका टाळण्यास मदत झाली.
घटनेची माहिती मिळताच गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, अमरदीप परचुरे, रायचंद गळवे आणि गुहागरचे गटशिक्षण अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून विद्यार्थी आणि पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. संकटाच्या वेळी धाडसाने पुढाकार घेत परिस्थिती हाताळणाऱ्या ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले.


